रत्नागिरी : 153 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या साखरीनाटे बंदराचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्य आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
साखरीनाटे मत्स्यबंदराचे भुमिपूजन झाले. यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले, "साखरीनाटे, मिरकरवाडा, हर्णे, ही तीनही बंदरे जिल्ह्यातील मच्छीमारांना ताकद देणारी आहेत."
त्यांनी सांगितले की, हर्णे बंदर विकासासाठी 200 कोटी याआधी मंजूर करण्यात आले आहेत. आता साखरीनाटे बंदरासाठी 153 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटी रुपये देण्यात येतील.
"कर्नाटक राज्यामधील मल्पी बंदरापेक्षाही सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असे सुंदर बंदरे जिल्ह्यात होतील," असे श्री. सामंत म्हणाले.
त्यांनी पुढच्या आराखड्यामध्ये येथील जोड रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल, असेही सांगितले. मच्छीमार भगिनींना मच्छी सुकवण्यासाठी दोन्ही ओटे त्यांच्या मागणीनुसार मंजूर केल्याचेही त्यांनी जाहीर केले.
श्री. सामंत म्हणाले, "विकास कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. गडकिल्ले संवर्धनासाठी 3 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी, मुख्यमंत्री सडक योजनेतून 50 किलोमीटरचे रस्ते राजापुरात मंजूर केले आहेत. साखरीनाटे बाजारपेठ रस्ता काँक्रिटीकरण, राजापूर तालुक्यातील धरणासही पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जामदा धरण डागडुजीचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मच्छीमारांचा डिझेल कोटा बंद संदर्भात आपण स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी तुमच्या खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही." शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: