'पुणे द सिटी' संवाद उपक्रमाचे उद्घाटन
पुणे : पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आणि नामांकित व्यक्तिमत्त्वांचे विधायक वैविध्य समोर आणण्यासाठी 'पुणे द सिटी' या पॉडकास्ट संवाद उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी खडकी येथे पार पडले. डी. वाय. पाटील विद्यापीठ (आकुर्डी) चे कुलगुरू प्रभात रंजन , निवृत्त कर्नल राजीव भारवान , आरजे सुमित आणि 'पुणे द सिटी' चे संस्थापक आनंद केशव आणि उदय श्रीवास यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुमार सुरेश , रुपम डे , राहुल भाकरे यांसारखे मान्यवरही उपस्थित होते.
'पुणे द
सिटी' पॉडकास्ट उपक्रम:
'पुणे द सिटी' या पॉडकास्ट संवाद कार्यक्रमाचा उद्देश विविध विषयांवरील विचारप्रवर्तक चर्चा आणि स्फूर्तिदायक अनुभवांच्या माध्यमातून श्रोत्यांना आकर्षित करणे आहे. या पॉडकास्टच्या पहिल्या भागात निवृत्त कर्नल राजीव भारवान यांच्याशी झालेल्या रोचक संवादाने आणि आरजे सुमित यांच्या कौशल्यपूर्ण संचालनाने कार्यक्रम सजला होता.
तरुणांनी शहरविकासासाठी काम करावे:
उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू प्रभात रंजन यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की, "तरुणांनी गर्दीचा भाग बनून राहू नये, तर आपल्या ध्येयासाठी झपाटून काम करावे. भारतातील आणि पुण्यातील हुशार मुलांची आपल्या देशाला अधिक गरज आहे. त्यांनी परदेशात शिक्षण घेऊनही आपल्या देशातच कर्मभूमी निवडावी आणि शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे. तरुणांनी रिस्क घ्यायला शिकले पाहिजे, आणि पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे."
कर्नल राजीव भारवान यांनी तरुणांना ब्रॅण्डच्या मागे लागू न जाण्याचे आणि जे आहे त्यात समाधान मानण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर फार अवलंबून राहू नये. स्वतःच्या हाताने निर्मिती करण्यात एक प्रकारची नशा आहे, ती तरुणांनी अनुभवली पाहिजे."
उदय श्रीवास यांनी सांगितले की, "या पॉडकास्टच्या माध्यमातून पुण्यातील सर्व प्रश्नांवर आवाज उठवणे आणि त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांनी या व्यासपीठाचा जास्तीत जास्त वापर करून शहरासाठी योगदान द्यावे."
आरजे सुमित यांनी उपस्थित पुणेकर, युवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी आनंद केशव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि 'पुणे द सिटी' उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आशावादी विचार व्यक्त केले.
'पुणे द सिटी' हा पॉडकास्ट संवाद उपक्रम शहरातील तरुणांना अधिक सशक्त करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकासासाठी तरुणांना प्रेरणा मिळेल, आणि त्यांच्या आवाजाला एक नवे व्यासपीठ मिळेल, अशी आशा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: