विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन
मुंबई : चंद्रपूर येथे सहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले.
भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात 'कांग्रेस का हाथ बलात्कारीयोंके साथ' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलकांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, "युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षाने लांछनास्पद कृत्य केल्यानंतर माताभगीनींच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असे म्हणणा-या काँग्रेसचा बुरखा फाटला आहे." त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले की त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि आरोपी अमोल लोंढे यावर कारवाई करणार की त्याला पाठीशी घालणार हे सांगावे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका खासगी शाळेतील सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांना अटक करण्यात आली आहे. लोंढे हा अकोला मार्गे मुंबई येथे पळून जात असताना अकोला बस स्थानकावर पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत लोंढे याने पीडित विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावून कार्यालयात नेले आणि तिला दोन गोळ्या खायला दिल्या. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिला धमकावण्यात आले. त्यानंतर लोंढे याने जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. घरी कोणाला सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र पालक व शिक्षकांनी कोरपना पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावून संताप व्यक्त केल्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वादळ उठले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: