विठ्ठल ममताबादे
उरण : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावावर होण्यासाठी सरकार सकारात्मक असून, लवकरच नामकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दिबांच्या संघर्षाचा सन्मान करीत सरकार दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळासाठी जाहीर करणार आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बरोबर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीत नामदार नायडू बोलत होते. या बैठकीचे आयोजन महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
नामकरणाच्या प्रक्रियेचा पाठपुरावा:
केंद्रीय मंत्री नायडू यांनी बैठकीत सुरुवातीलाच स्पष्ट केले की, "दि. बा. पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आलेला नाही. निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा दिबांचे नाव फार मोठे आहे. त्यांच्या नावासाठी कोणतीही अडचण नाही, आणि आम्ही त्यांच्या संघर्षाचा सन्मान करतो." त्यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, आणि लवकरच पीएमओ आणि कॅबिनेटकडे त्याचा पाठपुरावा होईल.
विमानतळाचे नामकरण लवकरच:
मंत्री नायडू यांनी अधोरेखित केले की, "विमानतळ सुरू होण्याआधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले जाईल." त्यांनी यासंदर्भात सर्व संबंधितांना आश्वासन दिले की, सरकार या नामकरणाच्या प्रक्रियेला लवकरच अंतिम रूप देईल.
बैठकीत मान्यवरांचा सहभाग:
या बैठकीत माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील , महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार श्रीरंग बारणे , धैर्यशील पाटील , समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील , उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर , माजी खासदार जगन्नाथ पाटील , माजी खासदार डॉ. संजीव नाईक , कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर , आमदार राजू पाटील , भूषण पाटील, जे. डी. तांडेल, संतोष केणे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
सरकारची स्पष्ट भूमिका:
केंद्रीय मंत्री नायडू यांनी बैठकीत स्पष्ट केले की, दिबांच्या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, आणि लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण दि. बा. पाटील यांच्या नावावर होईल.
केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिलेल्या आश्वासनामुळे नामकरण लढ्याला एक नवी दिशा मिळाली आहे. दिबांच्या नावासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि संघर्षाचा सन्मान करीत सरकार लवकरच अंतिम निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: