पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, इंद्रायणी पार्क येथील एका महिलेला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४० लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घालणार्या एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पकडले आहे.
कुमेर नखद दान (वय २४ वर्षे) राहणार राजस्थान असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने मोशी येथील एका महिलेला आरोपीने फिडिलेटी कंपनीच्या नावाने फेसबुकवर जाहिरात पाठवून तिला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले आणि कंपनीच्या अॅपद्वारे शेअर ट्रेडिंग केल्यास मोठा नफा मिळेल असे आश्वासन दिले. त्या महिलेने आरोपीच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा केली.
आरोपीने अॅपवर दाखवलेला नफा प्रत्यक्षात काढण्याचा प्रयत्न करताच तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने याबाबत प्रथम ऑनलाइन तक्रार केली आणि नंतर दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणात सायबर सेलने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आणि त्याला अटक केली. आरोपीने त्याच्या साथीदारांच्या साह्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने विविध बँक खात्यांचा वापर करून हा गुन्हा केला असून, त्यातील काही खात्यांमध्ये ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी आणि फसवणुकीच्या रकमेचा तपास सुरू आहे. त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, रविंद्र पन्हाळे, अंमलदार कृष्णा गवळी, हेमंत खरात, नितेश बिचेवार, विशाल निश्चीत, सुरंजन चव्हाण यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: