पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात रोहित धनवे टोळीवर मोक्का कारवाई

 


पिंपरी चिंचवड  : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली आहेत. कुख्यात गुन्हेगार रोहित प्रविण धनवे आणि त्याच्या टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोठा धक्का बसला आहे.

०३ जुलै २०२४ रोजी, पहाटे २:३० वाजता, एम. आय. डी. सी. भोसरी परिसरातील न्यू लकी स्कॅप सेंटर येथे गंभीर गुन्हा घडला. फिर्यादी विनोद राजबहादुर विश्वकर्मा यांना गुन्हेगारांनी शिवीगाळ करत, त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्याकडून २२ हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. या घटनेनंतर पोलिसांनी रोहित प्रवीण धनवे आणि त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक केली.

तपासादरम्यान, हा गुन्हा रोहित धनवेच्या टोळीने संघटीतपणे केला असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कलम ३(१)(ii) व ३(४) च्या अंतर्गत गुन्हा वाढवण्यात आला आहे.

रोहित धनवे हा पिंपरी-चिंचवड परिसरातील कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. एम. आय. डी. सी. भोसरी, नेहरुनगर, पिंपरी या भागात त्याची टोळी दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देत होती. मात्र, त्याच्या दहशतीमुळे लोक तक्रार करण्यास घाबरत होते.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. तसेच, या टोळीने पूर्वी कोणाला त्रास दिला असल्यास, किंवा कोणाला तक्रार करायची असल्यास, त्यांनी एम. आय. डी. सी. भोसरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षात २६ टोळ्यांवर मोक्काखाली कारवाई

पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने २०२४ वर्षात आतापर्यंत २६ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १५२ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. रोहित धनवे टोळीवरही तीव्र नजर ठेवून कारवाई करण्यात आली आहे. 


पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात रोहित धनवे टोळीवर मोक्का कारवाई पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात रोहित धनवे टोळीवर मोक्का कारवाई Reviewed by ANN news network on ९/०३/२०२४ ०८:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".