उत्तर प्रदेशची बस नेपाळमधील नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू

 


तनहुं (नेपाळ): उत्तर प्रदेशहून आलेली एक प्रवासी बस नेपाळमधील तनहुं जिल्ह्यातील मर्स्यांगदी नदीत कोसळल्याची भीषण घटना आज सकाळी घडली. या दुर्घटनेत १४ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील नोंदणीकृत बस (क्रमांक UP FT 7623) पोखराहून काठमांडूच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बसमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे समजते.

तनहुं जिल्ह्याचे उपअधीक्षक दीपकुमार राया यांनी या घटनेची पुष्टी केली असून बस नदीत कोसळल्याची माहिती दिली. बस पोखरा येथून निघून काठमांडूकडे जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे भारतीय प्रवासी पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबले होते आणि सकाळी काठमांडूकडे जात असताना हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही सुरू केली असून, या अपघातात राज्यातील कोणी नागरिक अडकले आहेत का याची तपासणी सुरू आहे.

गेल्या महिन्यात देखील नेपाळमध्ये अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती, जेव्हा दोन प्रवासी बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या होत्या. त्या घटनेत ५० हून अधिक प्रवासी होते, त्यापैकी केवळ तीन जणांनी पोहून आपला जीव वाचवला होता.

नेपाळमध्ये जून ते सप्टेंबर या काळात मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन आणि पूर यांचा धोका अधिक असतो. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या दोन महिन्यांत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या अपघात स्थळी बचाव कार्य सुरू असून, नेपाळ आणि भारत सरकारकडून मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक्षा आहे.

उत्तर प्रदेशची बस नेपाळमधील नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशची बस नेपाळमधील नदीत कोसळली; १४ जणांचा मृत्यू Reviewed by ANN news network on ८/२३/२०२४ ०४:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".