दापोली : दापोली-दाभोळ मार्गावरील उंबर्ले रोहिदासवाडी स्टॉप जवळ आज सकाळी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेअकराच्या सुमारास दापोलीहून दाभोळकडे जाणारी एसटी बस आणि दाभोळकडून येणारी दुचाकी यांच्यात उंबर्ले येथील बोरघरे यांच्या बागेसमोर समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार तैहसीन मथरुजी (वय ३५, रा. वणकर मोहल्ला, दाभोळ) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले शमशुद्दीन दांडेकर (रा. दाभोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शमशुद्दीन यांना तात्काळ दापोली येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस आणि एसटी आगाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. स्थानिक रहिवाशांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
एसटी प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, चालकाची चौकशी सुरू केली आहे. तसेच, अपघातग्रस्त कुटुंबियांना योग्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली असून, रस्ता सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२४ ०४:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: