डॉ. अमोल कोल्हे यांचे धक्कादायक आरोप: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारातून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल उभारले
पिंपरी:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भोसरीत झालेल्या जाहीर सभेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शहरात खळबळ माजवली आहे. त्यांनी एका व्यक्तीने महापालिकेतून भ्रष्टाचार करून लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल उभारल्याचा आरोप केला आहे. या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली असून या भ्रष्टाचारामागील 'तो' कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
डॉ. कोल्हे यांनी हे गंभीर आरोप केले. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख करत भ्रष्टाचाराच्या माध्यमातून शहरातील विकासकामांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे सांगितले.
खासदार कोल्हे यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने १४०० कोटी रुपये खर्च केले असले तरी, नदीची अवस्था गटारगंगेप्रमाणेच असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी "हे १४०० कोटी रुपये नेमके कुठे गेले?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी या रकमेतून शहरातील काही निवडक भागात मोठमोठे इव्हेंट घेण्यात आल्याचे आणि नागरिकांना फसवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सूचित केले.
याशिवाय, डॉ. कोल्हे यांनी भोसरीतील एका पादचारी पुलाच्या बांधकामासाठी ७० लाखांवरून ७ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे प्रकरण उघड केले. त्यांनी विचारले, "पुलासाठीचा खर्च इतका कसा वाढला?" आणि "२४ कॅरेट सोन्याचा पूल आहे का?" यावरून त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्प आणि अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणांमुळे शहरातील जनतेमध्ये महापालिकेतील कारभाराविषयी शंका निर्माण झाली आहे.
डॉ. कोल्हे यांनी केलेल्या या आरोपांवर भाजपकडून काय उत्तर येते आणि महापालिकेतील भ्रष्टाचारावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यांचा राजकीय वापर केला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Reviewed by ANN news network
on
८/११/२०२४ ०४:०२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: