बीड: बीड शहरातील मंडळ अधिकारी श्री. सचिन भागवत सानप यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या नातेवाईकांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. बीडच्या खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक ४९ मधील मुरूम उत्खननाच्या पंचनाम्यात मंडळ अधिकारी श्री. सचिन सानप यांनी १ हजार ब्रासऐवजी ५०० ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदाराला कमी दंड होण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम १.५ लाख रुपये ठरली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या मागणीची तक्रार दिली. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२४ रोजी श्री हॉटेल समोर बीड येथे सापळा रचण्यात आला. सापळ्यात मंडळ अधिकारी श्री. सचिन सानप यांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपये लाच स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सानप यांच्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर, व अपर अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणात शंकर शिंदे, उपअधीक्षक, बीड आणि त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ ०४:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: