नवी दिल्ली: लोकांच्या आरोग्याचा विचार करून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने १५६ एफडीसी (फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन) औषधांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी आरोग्य विभागाने मागील काही दिवसांपासून तयारी केली होती. या औषधांचे संयोजन शरीरावर प्रतिकूल परिणाम करू शकते, असा अहवाल मिळाल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
एफडीसी म्हणजे अशी औषधे जी दोन किंवा अधिक औषधांचे रसायन एकत्रित करून विशिष्ट प्रमाणात तयार केली जातात. सध्या देशभरात अशा प्रकारच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परंतु, ताप, सर्दी, ऍलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यांसारख्या किरकोळ आजारांवर उपचार करणाऱ्या १५६ एफडीसी औषधांवर आता बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या औषधांची विक्री मेडिकल स्टोअर्समधून करता येणार नाही. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही औषधे प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार, सरकारने फार्मा कंपन्यांकडून वापरण्यात येणाऱ्या काही प्रसिद्ध वेदनाशामक औषधांच्या कॉम्बिनेशनवर बंदी घातली आहे. यामध्ये एसेक्लोफेनाक ५० एमजी + पॅरासिटामॉल १२५ एमजी या टॅबलेट्सचा समावेश आहे. तसेच पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन, कॅफिन आणि मल्टीव्हिटॅमिनच्या काही कॉम्बिनेशन्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
ही औषधे अनेक घरांमध्ये प्रथमोपचार पेटीमध्ये असतात आणि किरकोळ आजारांवरील उपचारांसाठी वापरली जातात. परंतु, या औषधांच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे, जो देशातील फार्मा उद्योगावर मोठा परिणाम करू शकतो.
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२४ ०३:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: