पिंपरीत उद्या सत्याग्रह आंदोलन: महिला अत्याचाराविरोधात निषेध

 


पिंपरी : महाराष्ट्रासह देशभरात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या, शनिवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून एक मोठी पदयात्रा काढून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलनात पिंपरी चिंचवडमधील विविध सामाजिक संघटना आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बदलापूर, कोलकाता आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये अलीकडे घडलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली.बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष  तुषार कामठे, शिवसेना (उबाठा गट) शहरप्रमुख सचिन भोसले,  ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर,  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, मयूर जयस्वाल,  विनायक रणसुभे , धम्मराज साळवे, प्रदीप पवार, रोमी संधू, विश्वनाथ जगताप, अनिल रोहम, ज्ञानेश्वर मलशेट्टी, अमर नाणेकर आदी उपस्थित होते. 

बैठकीला उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी सांगितले की, "नागरिकांमध्ये पसरलेली भीती दूर करणे आणि त्यांना विश्वास देणे हे या सत्याग्रह आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे."

शिवसेनेचे (उबाठा गट) शहरप्रमुख सचिन भोसले यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, "सध्याचे भाजप महायुती सरकार अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे. त्यांना जागे करण्यासाठी हा 'महाराष्ट्र बंद' आवश्यक आहे."

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भर दिला की, "अशा घटना घडल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, ज्यामुळे गुन्हेगारांची मुजोरी वाढली आहे."

महाविकास आघाडीने नागरिकांना या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पदयात्रा आणि सत्याग्रह आंदोलनाद्वारे सरकारला जाब विचारण्याचा आणि समाजातील या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पिंपरीत उद्या सत्याग्रह आंदोलन: महिला अत्याचाराविरोधात निषेध पिंपरीत उद्या सत्याग्रह आंदोलन: महिला अत्याचाराविरोधात  निषेध Reviewed by ANN news network on ८/२३/२०२४ ०२:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".