मंडळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवा
पुणे: गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन शांततेत आणि मोठ्या आनंदाने साजरा करावा, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. गणेश मंडळांमध्ये आणि उत्सवाच्या नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कोथरूड, अलंकार, आणि वारजे हद्दीतील गणेश मंडळांच्या बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त जी.श्रीधर, आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या देशाची मोठी ताकद आपत्तीच्या काळात समाज संघटित होऊन सर्वांना मदत करण्यात आहे. कोविड काळात गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत केलेले सेवा कार्य अतिशय कौतुकास्पद होते. त्यामुळे आपण कोविडवर यशस्वीपणे मात करू शकलो.
ते पुढे म्हणाले की, महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. राजकारणातही त्यांचा सहभाग वाढावा यासाठी ३३ टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि उत्सवाच्या नियोजनामध्ये महिलांचा सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उत्सव काळात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. मंडळांनी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील म्हणाले की, गणेशोत्सव मंडळ ही मोठी शक्ती आहे, तिचा उपयोग समाजाच्या विकासासाठी आणि गरजूंना मदतीसाठी झाला पाहिजे. आगामी काळात गणेशोत्सव साजरा होत असताना मंडळांना आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्यावतीने होईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करू आणि हा उत्सव शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करूया, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त संभाजी कदम यांनी तीनही विभागात एकूण २७८ गणेश मंडळे असल्याचे सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी राखून पर्यावरण आणि आरोग्यवर्धक गणेशोत्सव साजरा करावा, तसेच मिरवणुकीत प्लाझ्मा आणि लेझरचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव विधायक आणि सर्वांना सोबत घेऊन साजरा करण्याची ग्वाही दिली.
Reviewed by ANN news network
on
८/२५/२०२४ ०१:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: