पनवेल : रायगड जिल्ह्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या अमेझॉन कंपनीच्या वानिवली येथील गोदामातून तब्बल ३ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करून तीन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संजय गंगा मंडरा, सुभाष लाले यादव (रा. इंदिरानगर सर्कल, तुर्भे, मूळ उत्तर प्रदेश),महादू राजू उपले (रा. गणपती मंदिर, तुर्भे एमआयडीसी, मूळ बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. लोहप, तळवली ते नवी मुंबई या मार्गावरील २८ सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. यातून चोरीसाठी वापरलेल्या टेम्पोचा (एमएच ४३ सीई ५३९९) शोध लागला. टेम्पो मालकाची चौकशी केली असता त्याने सदर वाहन रात्रीच्या वेळी संजय गंगा मंडरा याला भाड्याने दिल्याचे सांगितले.
पुढील तपासात संजय गंगा मंडरा याला ताब्यात घेतले असता त्याने आपल्या दोन साथीदारांसह ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यानुसार सुभाष लाले यादव आणि महादू राजू उपले या दोघांनाही अटक करण्यात आली.
आरोपींच्या तुर्भे येथील झोपडीतून लपवून ठेवलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण ६ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, महेश धोंडे, सहाय्यक उपनिरीक्षक लालासाहेब कोळेकर आणि हवालदार सचिन चौरे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
८/२५/२०२४ ०४:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: