पुणे : हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली आहे. या कारवाईमुळे पुणे परिसरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय बाबुलाल राकावत (वय २८, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) आणि मदनलाल छोटुराम देवासी (वय २५, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) अशी आहेत. दोन्ही आरोपी मूळचे राजस्थानचे रहिवासी असून सध्या पुण्यात वास्तव्यास होते.
प्रकरणाची माहिती अशी की, १९ ऑगस्ट रोजी जांबे (ता. मुळशी) येथून एका व्यक्तीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीस गेली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी लक्ष्मी चौक, मारुंजी रोड येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीत आरोपींनी आणखी चार दुचाकी आणि एक ऑटोरिक्षा चोरल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी हिंजवडी, वाकड, हडपसर आणि पौड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या एकूण सहा गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक गोमारे, पोलीस हवालदार शिंदे, नरळे, पोलीस शिपाई शिंदे आणि पालवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे पुणे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही आपल्या वाहनांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२४ ०८:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: