देहूरोड: भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या म्यानमारच्या चार नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी एमबी कॅम्प, देहूरोड येथे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहिद उर्फ सुहिद्दुल उर्फ स्मायली कालुस्लाम शेख (वय 35, रा. एम बी कॅम्प, देहूरोड) आणि मुजम्मील मोहम्मद अमिन खान (वय 43, रा. गांधीनगर, देहूरोड) अशी आहेत. त्यांच्यासोबत दोन महिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक फौजदार अशोक पेरणेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी म्यानमारचे नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्रे नाहीत. त्यांनी भारत-म्यानमार सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतात प्रवेश केला आहे. म्यानमारमधून भारतात येताना त्यांनी रेफ्यूजी म्हणून कोणताही वैध दाखला सादर केला नाही. ते सन 2012 पासून देहूरोड परिसरात अवैधरित्या वास्तव्य करत होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. देहूरोड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: