पिंपरी: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या तक्रारींवर सखोल चर्चा केली. एम. व्यंकटेशन यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणाविषयीच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याची सूचना दिली.
एम. व्यंकटेशन यांनी महापालिकेतील कंत्राटी आणि कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याची व्यवस्था करणे, वेतन वेळेत मिळावे, आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, सफाई कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वितरीत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांनी या बैठकीत उपस्थितीत असलेल्या अन्य अधिकारी आणि संघटनांशी चर्चा करताना, महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कौशल्य विकासासाठी मोफत कोर्सेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. तसेच, तक्रारींच्या सोडवणुकीसाठी संबंधित ठेकेदारांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले.
शेवटी, एम. व्यंकटेशन यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली आणि नियुक्तीपत्रक वितरित केले.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२४ १२:१५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: