मुंबई: मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीसाठी महाविकास आघाडीचे नेते गैरहजर होते. यावरून आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत मांडला. मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी दुर्लक्ष केले. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आवश्यक होती, पण ते आले नाहीत, असा आरोप दरेकरांनी केला. त्यामुळे विधानपरिषदेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सत्ताधारी आणि विरोधक वेलमध्ये जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले, पण गोंधळ कमी झाला नाही. या गोंधळामुळे चर्चा कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी मार्शलला बोलवण्याचे आदेश दिले, तरीही गोंधळ थांबला नाही. शेवटी, नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
दुसरीकडे, विधानसभेतही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद झाला. कालच्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला विरोधकांनी अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांनी सभागृहात विरोधकांविरोधात घोषणाबाजी केली. भाजप आमदार अमित साटम आणि आशिष शेलार यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना धारेवर धरले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या बैठकीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांचे आरक्षणाबाबतचे प्रेम फक्त देखावा असल्याचे स्पष्ट झाले आणि ते सर्वजण उघडे पडले, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
Reviewed by ANN news network
on
७/१०/२०२४ ०५:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: