एका महिन्याच्या आत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अग्नि आणि विद्युतसुरक्षा प्रमाणपत्र घ्या : शेखर सिंह
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल व्यावसायिकांना एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी हॉटेल व्यावसायिकांना निर्देश दिले आहेत की, त्यांच्या व्यवसाय इमारतींचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' एका महिन्याच्या आत करून घ्यावे. तसेच महापालिकेकडून व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि विद्युत सुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या संदर्भात महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील आयुक्तांच्या दालनात हॉटेल व्यावसायिक संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त शेखर सिंह होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांच्यासह विविध हॉटेल संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, आणि इतर व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने येत्या काही दिवसांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्यास त्यांच्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येतील.
हॉटेल्स, बार, आणि रेस्टॉरंट्सच्या ठिकाणी करावयाच्या अग्निशामक यंत्रणेविषयी उप आयुक्त मनोज लोणकर यांनी सविस्तर माहिती दिली. सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिक इमारतींच्या व्यवसाय मालकांनी आपल्या इमारतींचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रे वेळेवर घेणे अत्यावश्यक आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: