पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राइम सेलची कामगिरी
पिंपरी : कर्जत येथील एका व्यक्तीला भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेअरबाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडत त्याला ११ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घालणार्या चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथील दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने बेड्या ठोकल्या आहेत.
सतीश सुरेश बुंदेले रा. बी-११, मोरेश्वर विहार, गोलांडे इस्टेट, लिंक रोड, गावडे पंपाजवळ, चिंचवड, पुणे आणि परेश गुलाब बिरदवडे रा. बी - ७, सृष्टी अर्पाटमेंट, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड पुणे अशी या दोघांची नावे आहेत.
एक व्यक्ती दररोज नवनव्या व्यक्तीला बरोबर आणून वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांची खाती उघडत असल्याची माहिती सायबर क्राइम सेलचे अंमलदार सूरज शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी तपास करून या व्यक्तीचे नाव सतीश बुंदेले असल्याचे शोधून काढले. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने परेश बिरदवडे याने आपणास ही खाती काढावयास लावून त्याद्वारे पैसे स्वीकारले असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी बिरदवडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कर्जत येथील एका व्यक्तीस शेअरबाजारात गुंतवणूक केल्यास भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ११ लाख ७५ हजार रुपये उघडलेल्या खात्यावर स्वीकारल्याची कबुली दिली.
पोलिसांनी अधिक तपास केला असता देशभरात एकंदर ४० ठिकाणी या संदर्भात फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या असल्याचे पुढे आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांनाही कर्जत पोलीसठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, रविंद्र पन्हाळे, हवालदार दिपक भोसले, शिपाई अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, सूरज शिंदे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
७/०५/२०२४ ०५:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: