तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. मद्य प्राशन करून केलेला अपघात आणि नगरपरिषदेतील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी 8 जुलै रोजी याबाबतचे आदेश दिले.
मद्य प्राशन आणि अपघात:
1 जून रोजी एन. के. पाटील यांनी मद्य प्राशन करून निष्काळजीपणे कार चालवत शहरातील दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रक्ताच्या तपासणीत मद्य प्राशन करून वाहन चालविल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
असभ्य वर्तनाचे आरोप:
एन. के. पाटील यांच्यावर नगरपरिषदेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी आक्षेपार्ह, असभ्य आणि अशोभनीय वर्तन केल्याचे आरोप आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि नगरपरिषद प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांनी राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालात याबाबत नमूद केले आहे.
या सर्व आरोपांमुळे एन. के. पाटील यांना 8 जुलैपासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांचे निलंबन लागू राहणार आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०९/२०२४ ११:१७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: