राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतापदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड

 


नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या नेतापदी नरेंद्र मोदी यांची ७ जून रोजी सर्वानुमते निवड झाली.

जुन्या संसदभवनातील मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीला आघाडीतील घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींची एनडीए नेते म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्व एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.

पंतप्रधानांची लोकसभेतील भाजपचे नेते आणि भाजप संसदीय पक्ष म्हणूनही निवड झाली.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, एनडीए हा सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांचा समूह नाही, तर 'प्रथम राष्ट्र' या तत्त्वाला बांधील असलेली आघाडी आहे.

ते पुढे म्हणाले, "आज, एनडीए भारताच्या राजकीय व्यवस्थेत एक  खरोखरीची युती म्हणून चमकत आहे... एनडीए सरकारने देशाला चांगले प्रशासन दिले आहे आणि एक प्रकारे, एनडीए हे सुशासनाचा समानार्थी शब्द बनले आहे. गरीब कल्याण आणि आपल्या सर्वांच्या केंद्रस्थानी सुशासन सर्वोपरि आहे."

एनडीएचा नेता म्हणून निवड केल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचे आभार मानताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्ही सर्वांनी एकमताने माझी एनडीएचा नेता म्हणून निवड केली आणि माझ्यावर नवीन जबाबदारी दिली हे माझे भाग्य आहे."

4 जून रोजी निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आता गप्प झाले, असे म्हणत त्यांनी विरोधी इंडिया आघाडीवरही टीका केली. ते म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत एनडीएला पराभूत करणार असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न करणार्‍या विरोधकांचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली ते म्हणाले, एव्हढा जुना पक्ष पण या निवडणुकीत त्यांना १०० चा आकडाही गाठता आला नाही. 

एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "ते या पदासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत आणि ही युती ही मजबुरी नसून ती आमची बांधिलकी आहे."

या प्रस्तावाला पाठिंबा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "ही फक्त एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बसलेल्या नेत्यांचीच नाही तर देशातील १४० कोटी जनतेची इच्छा आहे."

टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर एनडीए सहयोगींनी नरेंद्र मोदी यांना लोकसभेचे नेते, भाजप आणि एनडीए संसदीय पक्षाचे नेते म्हणून नामांकन करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "बिहारची सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. ही खूप चांगली गोष्ट आहे की आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि आम्ही सर्वजण तुमच्या सोबत काम करू. 

प्रारंभी भाष्य करताना, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू म्हणाले, "नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारने गेल्या दहा वर्षांत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.देशाने उल्लेखनीय प्रगती आणि परिवर्तन पाहिले आहे.मी निवडणूक प्रचारादरम्यान पाहिले आहे, ३ महिने पंतप्रधान मोदींनी कधीही विश्रांती घेतली नाही. त्यांनी रात्रंदिवस प्रचार केला." ते पुढे म्हणाले, "प्रादेशिक आकांक्षा संतुलित करून, समाजाच्या सर्वस्तरांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय हित समांतर चालले पाहिजे."

बैठकीत उपस्थित इतरांसह  पीयूष गोयल, अनुराग सिंह ठाकूर, लोजप (आर) प्रमुख चिराग पासवान, शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएलडी प्रमुख जयंत चौधरी, जनसेना प्रमुख पवन कल्याण, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल, जेडी (एस) नेते एचडी कुमारस्वामी उपस्थित होते. 

या बैठकीनंतर एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. सर्व एनडीए घटकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंब्याची पत्रे सादर करणे अपेक्षित आहे. नरेंद्र मोदी ९ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.


राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतापदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतापदी नरेंद्र मोदी यांची सर्वानुमते निवड Reviewed by ANN news network on ६/०७/२०२४ ०३:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".