पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका इमारतीतील मुलींच्या वसतिगृहाला ७ मे रोजी पहाटे १ वाजून २० मिनिटांनी आग लागली. तेथे रहात असलेल्या ४० मुलींना वाचवण्यात अग्निशमनदलाला यश आले. मात्र, तेथील वॉचमनचा या दुर्घटनेत गुदमरून मृत्यू झाला.
सागर कुलकर्णी असे मृत वॉचमनचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदाशिवपेठ, कुमठेकर रस्त्यावर लक्ष्मीकृपा नावाची इमारत आहे. या इमारतीत निलय मेहता नावाच्या व्यक्तीने जागा भाड्याने घेतली असून तो तेथे निलय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चालवतो. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुलींचे वसतिगृह आहे. ४० मुली त्यात राहतात. तर, चवथ्या आणि पाचव्या मजल्यावर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. पाचव्या मजल्यावर असलेल्या कॅन्टीन शेजारील भागात एक कुटुंब रहाते.
रात्री १ वाजून २० मिनिटांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यामुळे जाग आल्यानंतर त्यांना धूर दिसला.त्यामुळे इमारतीत आग लागल्याचे समजले. त्यानंतर अग्निशमनदलाला बोलावण्यात आले. वसतिगृहातील विद्यार्थिनी आणि कॅन्टीनशेजारी राहणारे कुटुंब हे सर्व इमारतीच्या टेरेसवर गोळा झाले. अग्निशमनदलाने शिड्यांच्या साह्याने त्यांची सुटका केली.
दरम्यान इमारतीचा वॉचमन सागर कुलकर्णी बेपत्ता असल्याचे समजल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला असता तो एका खोलीत बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या संदर्भात अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, रात्री १ वाजून २० मिनिटांनी आम्हाला आग लागल्याची खबर मिळाली. तात्काळ त्या ठिकाणी तीन बंब, एक रेस्क्यू व्हेईकल आणि पाण्याचे टँकर पाठविण्यात आले. पहाटे अडीचपर्यंत आग विझवणे आणि कुलींगचे काम सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: