जागतिक दृष्टिदान दिवस साजरा
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थल्मॉलॉजी(शिवाजीनगर)तर्फे जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त १० जून रोजी नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली, रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला . 'भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टीहानी अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.त्यामुळे लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी नेत्रदानाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे',असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थल्मॉलॉजीचे संस्थापक डॉ.श्रीकांत केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले .
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ.आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.त्यानिमित्ताने बोलताना डॉ.श्रीकांत केळकर म्हणाले,'जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि डोळ्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे हे आहे. नीट काळजी घेतली तर डोळ्यांच्या समस्या उद्भवणार नाहीत. डोळे निरोगी राहतील.कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टीहानी यानंतर दृष्टी वाचविण्यासाठी उपचार आवश्यक आहे.मरणोत्तर नेत्रदान हे दृष्टी गेलेल्या दुसऱ्या कोणाच्या जीवनात प्रकाश आणू शकते,त्यामुळे वेळीच नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे.'
'कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे काढून परिचित-अपरिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून दिलेली परवानगी म्हणजे नेत्रदान होय. कोणत्याही जाती, धर्म, वंश, वर्णाची स्त्री अथवा पुरुष मरणानंतर नेत्रदान करू शकतो. एक वर्षाच्या बालकापासून ८० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत कुणीही नेत्रदान करू शकतो.ज्या लोकांना बुब्बुळाच्या विकारामुळे अंधत्व आले आहे, अशा लोकांना नेत्रदानाचा फायदा होतो. त्यालाच कॉर्नियल ब्लाइंडनेस असे म्हणतात. नेत्रदानानंतर केवळ डोळयाच्या बुब्बुळाचे प्रत्यार्पण केले जाते, पूर्ण डोळा बदलला जात नाही',असेही डॉ.केळकर यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ १२:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: