पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक काधून टाकण्यास आज २० मे पासून सुरू केली असून ‘इ’ क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रातील ५ जाहिरात फलक काढण्यात आले. येत्या तीन दिवसांत शहरातील बाकीचे अनधिकृत फलक काढले जातील अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत अ (३), ब (५), क (३), ड (२), इ (५), फ (६) असे मिळून क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २४ अनधिकृत फलक आढळले असून वाढीव ३२१ जाहिरात फलक आढळले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील होर्डिंग्सबाबत महापालिका अधिकारी, जाहिरात फलक धारक यांच्यासमवेत शुक्रवार १७ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी फलकधारकांना अनधिकृत जाहिरात फलक दोन दिवसात हटविण्याबाबत तसेच अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अनधिकृत फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, या कारवाईस आजपासून सुरूवात झाली.
३०x२० चे २ फलक ४०x२० चे २ फलक १५x२० चा १ फलक असे एकूण ५ फलक आजच्या कारवाईत निष्कासित करण्यात आले. या कारवाई दरम्यान सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त संदीप खोत, कार्यालय अधिक्षक ग्यानचंद भाट, परवाना निरीक्षक, मजूर, एमएसएफ जवान तसेच महापालिका सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
३१ मे पर्यंत होर्डिंग्स परवानाचे नूतनीकरण करावे अन्यथा कारवाई
२०२४-२५ साठी होर्डिंग्स परवाना नूतनीकरण ३१ मे २०२४ पर्यंत करावे अन्यथा सदरचे होर्डिंग्स अनधिकृत समजून निष्कासनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फेरपडताळणीबाबत सूचना
आज सकाळी आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह परवाना विभाग, शहर अभियंता, सर्व क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत आपआपल्या प्रभागातील अनधिकृत होर्डिंग्सचे सर्वेक्षण करण्याच्या व फेरपडताळणी करण्याच्या सूचना दिल्या.
कनिष्ठ संरचना अभियंत्यांची करण्यात येणार नेमणूक
शहर अभियंता कार्यालयामार्फत स्ट्रक्चरल स्टॅबिलीटी सर्टिफिकेटचा नमुना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच फलक उभारण्यात आलेल्या जागेवर पाहणी करण्यासाठी २ कनिष्ठ संरचना अभियंत्यांची नेमणूक महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. यामुळे जाहिरात फलकाच्या संरचनात्मक लेखापरिक्षण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासही मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: