पुणे : पुणे शहरानजिक लोणी काळभोर परिसरात १८ मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वार्यांसह जोरदार पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गानजिक एक मोठे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात दोन व्यक्ती आणि एक घोडा जखमी झाला आहे. कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे ही दुर्घटना घडली.
भरत साबळे (वय-५७, रा. येरवडा, पुणे) आणि अक्षय कोरवी (वय -27, रा. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गुलमोहर लॉन्समध्ये असलेल्या कार्यक्रमासाठी पुण्यातून एक बँडपथक आले होते. वादन सुरू होते. जवळच एक घोडा बांधलेला होता.सव्वाचारच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. पाऊसही सुरू झाला. त्यामुळे महामार्गानजिक असलेले भलेमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग बँडपथकाच्या टेम्पोवर कोसळले. घोडा आणि होर्डिंगखाली भरत साबळे व अक्षय कोरवी हे त्याखाली अडकले.
नागरिकांनी तातडीने त्यांना बाहेत काढले. क्रेनचा वापर यासाठी करण्यात आला. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे समजते.
घटनेचे वृत्त कळताच लोणी काळभोर पोलीसठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासन ही होर्डिंग्ज काढण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करत आहे. दरम्यान यातील अनेक होर्डिंग्ज विनापरवाना असल्याची चर्चाही नागरिकात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: