चिखली पोलिसांची चमकदार कामगिरी
पिंपरी : चिखली, जाधववाडी परिसरातील एका व्यावसायिकाने व्यावसायिक स्पर्धेमुळे सुडाने पेटून उठत प्रतिस्पर्ध्यावर गोळीबार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला १२ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास जाधववाडी ते पंतनगर रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ हा प्रकार घडला होता. चिखली पोलिसांनी निवडणुकीच्या धामधुमीतही या प्रकरणाचा तपास करून अवघ्या दोन तासात आरोपीला शोधून त्याला गजाआड करण्यात यश मिळविले.
हर्षल सोनावणे, शाम चौधरी आणि किर्तीकुमार लिलारे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी अजय सुनील फुले याने चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपींवर भारतीय दंडविधान कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा, शस्त्र कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हर्षल सोआवणे याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आरोपी कीर्तीकुमार लिलारे हा देखील जखमी झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार अजय फुले आणि हर्षल सोनावणे या दोघांचेही जाधववाडी परिसरात गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांच्यात व्यावसायिक स्पर्धा सुरू होती. त्यातून वाद उद्भवले होते. त्यानंतर सुडाने पेटून उठलेल्या हर्षल सोनावणे याने शाम चौधरी आणि किर्तीकुमार लिलारे यांना हाताशी धरून कट रचला.
१२ मे रोजी सायंकाळी शाम चौधरी आणि किर्तीकुमार लिलारे यांनी तक्रारदार अजय फुले याला वाद मिटविण्यासाठी म्हणून दुकानातून बोलावून पंतनगर येथे नेले. आरोपी हर्षल सोनवणे याने तिथे येऊन तीन गोळ्या तक्रारदार अजय फुलेवर झाडल्या. त्यातील एक गोळी अजय याच्या दंडाला लागली. दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारे याच्या मानेवर लागली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर आरोपी हर्षल सोनवणे मोबाईल बंद करून पसार झाला. त्याला शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याला नाणेकरवाडी परिसरातून शोधून काढत अटक केली. शाम चौधरीला देहुरोड परिसरातून अटक करण्यात आले. तर, किर्तीकुमार लिलारे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर संदेश पाठवून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. तो मोरवाडी परिसरातील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे पोलिसांनी शोधून काढले.
निवडणुकीची धावपळ सुरू असतानाही चिखली पोलिसांनी आरोपींना शोधून काढल्याने त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कामगिरी सहायक निरीक्षक उध्दव खाडे, उपनिरीक्षक महेश मुळीक, दत्तात्रय मोरे, सहायक फौजदार वडेकर, कडलग, हवालदार बाबा गर्जे, संदीप मासाळ,विश्वास नाणेकर, चेतन सावंत,आनंदा नांगरे, भास्कर तारळकर, सुनिल शिंदे, नाईक अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड आदींनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: