पुणे जिल्ह्यात १०२ ठिकाणी तर; देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन (VIDEO)

 


रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता ! :  पराग गोखले

पुणे :   श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात 102 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. तसेच देशभरात 757 ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ 3 सहस्रहून अधिक जणांनी घेतला.  

       या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

     या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले म्हणाले की, युगानुयुगे मारुतीरायाचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती त्यांची ‘गदा’ ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करून प्रभु श्री रामचंद्रांच्या ‘रामराज्या’साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी 11 मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करून घेतली. आता पुन्हा अयोध्येत 500 वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे.

      गदापूजनाचे कार्यक्रम पुणे शहर तसेच सासवड, मंचर, भोर आदी ठिकाणी झाले. भिकारदास मारुती मंदिर, पुणे येथील गदापूजन कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि पूज्य (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली, यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री.सुनील घनवट हेही उपस्थित होते. तसेच अन्य ठिकाणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

पुणे जिल्ह्यात १०२ ठिकाणी तर; देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन (VIDEO) पुणे जिल्ह्यात १०२ ठिकाणी तर;  देशभरात ७५७  ठिकाणी सामूहिक गदापूजन (VIDEO) Reviewed by ANN news network on ४/२३/२०२४ ११:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".