प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्यासाठी समोशात टाकले निरोध, खडे आणि गुटखा

 


व्यावसायिक स्पर्धेतून किळसवाणा प्रकार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील टाटा मोटर्स या जगभरात ख्याती असलेल्या कंपनीला खाद्यपदार्थ पुरवणार्‍या कंत्राटदार कंपनीने योग्य सेवा न देणार्‍या  उपकंत्राटदाराचे कंत्राट बंद केल्यामुळे सुडाच्या भाननेने पेटून उठलेल्या उपकंत्राटदाराने आपले विश्वासू नोकर ज्या कंपनीला काम मिळाले आहे त्या कंपनीत मजूर म्हणून घुसवून टाटा मोटर्सला पुरविल्या जाणार्‍या समोशात निरोध, खडे आणि गुटखा मिसळल्याचा किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी हे कारस्थान करणार्‍या कंपनीच्या मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

एसआरएस एंटरपायझेसचे मालक रहीम शेख, अझर शेख, मझर शेख (रा. मोरवाडी, पिंपरी) कामगार फिरोज शेख उर्फ मंटू, विकी शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किर्तीकुमार शंकरराव देसाई (वय-36 रा. पाटीलनगर, बालेवाडी, पुणे) या प्रकरणी ७ एप्रिल रोजी चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे.

किर्तीकुमार देसाई औंध येथील कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीत सहायक महाव्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीला टाटा मोटर्समध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यांच्या कंपनीने आरोपींच्या मोरवाडी येथील एसआरएस एंटरप्रायझेस बरोबर करार करुन टाटामोटर्सला समोसे पुरवण्याचे उपकंत्राट दिले. एकदा एसआरएस एंटरप्रायझेसकडून आलेल्या समोश्यात प्रथमोपचार पट्टी सापडल्याने कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्सने एसआरएस एंटरप्रायझेसचे उपकंत्राट रद्द करून ते पुण्यातील मनोहर एन्टरप्रायझेसला दिले. यामुळे सूडाच्या भावनेने पेटून उठलेल्या एसआरएस एंटरप्रायझेसचे मालक रहीम शेख, अझर शेख व मझर शेख यांनी मनोहर एन्टरप्रायझेसचे उपकंत्राट बंद व्हावे म्हणून कट रचून आपणाकडील कामगार फिरोज शेख व विकी शेख यांना समोसा पुरवणाऱ्या मनोहर एंटरप्रायझेस कंपनीत रोजंदारीवर कामाला पाठवले. त्यांनी आपल्या मूळ मालकाच्या सांगण्यावरून मनोहर एन्टरप्रायझेसमध्ये टाटा मोटर्ससाठी समोसे बनवत असताना त्यात निरोध, खडे आणि गुटखा मिसळले.

हा प्रकार समजल्यावर टाटा मोटर्सला खाद्यपदार्थ पुरविण्याचे मूळ कंत्राट असलेल्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्सचे सहायक महाव्यवस्थापक किर्तीकुमार देसाई यांनी  चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका कामगाराला अटक केली आहे.

प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्यासाठी समोशात टाकले निरोध, खडे आणि गुटखा प्रतिस्पर्ध्याला बदनाम करण्यासाठी समोशात टाकले निरोध, खडे आणि गुटखा Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ ०३:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".