पिंपरी : निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जावे लागू नये म्हणून आजारी असल्याचे कारण दाखविणार्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात नेमणूक असलेल्या भूषण अनिल चिंचोलीकर या पोलीस शिपायाची नेमणूक १२ ते १९ एप्रिल पर्यंत लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे करेअण्यात आली होती. चिंचोलीकर यांच्यासह एकंदर ५० जणांना या लामासाठी पाठविले जाणार होते. त्यासाठी १० एप्रिल रोजी पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या हजेरीच्यावेळी चिंचोलीकर गैरहजर होते. त्यांनी आपण आजारी असल्याचे फोनद्वारे मुख्यालयात कळविले. निवडणुकीचे काम असल्यामुळे त्यांच्या आजाराबाबत त्यांनी उपचार घेतलेल्या डॉक्टरकडे चौकशी करण्यात आली. डॉक्टरने चिंचोलीकर जुलाब, उलटी, ताप, पोटदुखी यावर उपचार घेण्यासाठी आपल्याकडे आल्याचे सांगितले. त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन तपासण्या करून घ्याव्यात असा सल्ला आपण त्यांना दिला. पण, त्यांनी तपासण्या करून घेतल्या नाहीत. त्यांना होत असलेला त्रास फारसा गंभीर नव्हता असे डॉक्टरने चौकशीच्यावेळी सांगितल्याने चिंचोलीकर यांनी जाणूनबुजून कामात कसुरी करण्याचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष काढत त्यांना निलंबित करण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
४/२०/२०२४ ११:२३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: