पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात यंदा सर्वाधिक ९७७ कोटी करवसुली!
१६१ कोटींनी उत्पन्न वाढले!!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 1 हजार कोटींच्या जवळपास टप्पा गाठला आहे. हा कर संकलन विभागाचा एक माईलस्टोन ठरला आहे. 6 लाख 25 हजार मालमत्ता धारकांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. कर भरणा-या प्रामाणिक करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.
यंदा कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख आणि त्यांच्या टीमने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे.
गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया, मीम्स, रिल्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मिडीयाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पिकरवर थकबाकीदारांच्या नावांची घाेषणा करणे, जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात केली. याचे फलित म्हणूनच एक हजार काेटींच्या जवळपास कर वसुल झाला आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी नागरीकांना मालमत्ता कराची बिल ऑनलाईन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपुर्व नोटीसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.
ऐतिहासिक बाबीं ठळकपणे
# महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 977 काेटींची मजल
# दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.
# विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाईन.
#पहिल्यांदाच 87 टक्के चालू कर वसूल करण्यात यश
# 49.36 टक्के थकीत कर वसूल करण्यात यश
वाकड झोनमधून 154 काेटींचा उच्चांकी कर वसूल
शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 68 हजार मालमत्ता धारकांनी 154 काेटी 58 लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवीत 51 हजार 718, चिखलीत 45 हजार 634, थेरगावमध्ये 45 हजार 434, चिंचवडमध्ये 43 हजार 286, माेशीत 34 हजार 980, भाेसरीत 33 हजार 867 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 527 मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे.
यंदा आम्ही एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोचलो याचे समाधान आहे. मालमत्ताधारकांना मी यानिमित्त धन्यवाद देऊ इच्छितो. या वर्षी आम्ही प्रथमच सिद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गट महिलांकडून बिले वाटप, डाटा अनालिसिस, जनजागृतीसाठी उत्तम क्रिएटिव्ह, सर्व सेवा ऑनलाईन करणे अशा विविध माध्यमातून नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचाच हा परिणाम आहे. या कराचा विनियोग हे शहर उत्तम शाश्वत विकासाचे मॉडेल होण्यासाठीच केला जाईल. सन 2024-25 या वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. तसेच सर्व मालमत्तांच्या युपिक आयडी द्वारे महापालिकेच्या सर्व सेवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.शेखर सिंह,आयुक्त

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: