दोन्ही मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहिम येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकराबरोबर संसार थाटता यावा म्हणून आपल्या पाव आणि तीन वर्षांच्या लहान बालकांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी शीतल सदानंद पोले (वय २५) या स्त्रीला ८ एप्रिल रोजी अटक केली आहे. तिने ३१ मार्च रोजी आपल्या आराध्या सदानंद पोले (वय ५ वर्षे) आणि सार्थक सदानंद पोले (वय ३ वर्षे) या दोन लेकरांचा गमछा तोंडावर दाबून आणि हाताने नाक, तोंड दाबून खून केला. आणि हे गुन्ह्याचे कृत्य लपविण्यासाठी दोन्ही मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला होता.
या दोन्ही बालकांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यावर १ एप्रिल रोजी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी ते क्रियाकर्म उरकण्यासाठी त्यांचे मूळ गाव पुसद, यवतमाळ येथे नेले. त्यावेळी त्यांना शीतलचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागली. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी कसून तपास करत ८ एप्रिल रोजी आरोपी शीतल हिला ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तिला आपल्या प्र्यकरासोबत संसार थाटायचा होता. मात्र, तो दोन्ही मुले स्वीकारण्यास तयार नव्हता. त्यामुळे, आरोपी शीतल हिने हे अघोरी कृत्य केले असे तपासात समोर आले आहे.
मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बी.बी.खाडे यांनी या प्रकरणी मोलाची कामगिरी बजावली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: