पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात ८ एप्रिल रोजी एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात तो पोलीस गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रशांत संतोष कदम, वय २० वर्षे, रा. निरगुडी, ता. हवेली, जि. पुणे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात श्रीकांत पोपटराव टेमगिरे, वय ३९ वर्षे, पोलीस उपनिरीक्षक, दिघी आळंदी वाहतूक विभाग यांनी दिघी पोलीसठाण्यात तक्रार दिली असून आरोपीविरोधात १६९ / २०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कायदा कलम ३०७, ३५३, ३३३, २७९ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तकारदार उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे हे आपले सहकारी हवालदार कल्याण भोसले,शिपाई मयूर सावंत व राहुल मोटे यांच्यासह अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेजरोड, पठारेचौकाच्यापुढे, लेबरकॅम्पजवळ, चर्होली येथे ८ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाहतुकीचे नियम न पाळणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी थांबले होते.
यावेळी चर्होली बुद्रुक गावाकडून एम. एच. १४ सी सी २०१२ क्रमांकाची पांढर्या रंगाची मारुती सुझुकी अल्टो कार आली. या कारच्या काचांना गडद काळ्या रंगाची फिल्म लावली असल्याने हवालदार भोसले आणि शिपाई मोटे यांनी या कारच्या चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने न थांबता कार पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. कार अडविण्यासाठी शिपाई मोटे पुढे आले असता त्यांच्या जीवाची पर्वा न करता आरोपीने त्यांना जोराने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोटे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, पायाला,पाठीला, खांद्याला मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक भामरे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: