मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखेची कामगिरी
मुंबई : नवजात बालकांची विक्री करणार्या एका ७ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष चारला यश आले आहे. या आंतरराज्य टोळीत एका डॉक्टरचाही समावेश आहे.
वंदना अमित पवार, वय २८ वर्षे, शीतल गणेश वारे, वय ४१ वर्षे, स्नेहा युवराज सुर्यवंशी, वय २४ वर्षे, नसीमा हनीफ खान, वय - २८ वर्षे, लता नानाभाऊ सुरवाडे, वय - ३६ वर्षे, शरद मारुती देवर, वय - ४५ वर्षे, डॉ. संजय सोपानराव खंदारे (बी. एच. एम. एस.), वय - ४२ वर्षे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वंध्यतेवर उपचार करणार्या केंद्रांचे एजंट म्हणून काम करताना दवाखान्यांशी संबंध आल्यानंतर गरीब व गरजू कुटुंबांना पैशांचे आमिष दाखवत त्यांची बालके अन्य नागरिकांना विकून पैसा कमावणार्या या टोळीकडून दोन बालके परत मिळविण्यातही पोलिसांना यश आले आहे.
गुन्हेशाखेच्या पथकाला कन्नमवारनगर, विक्रोळी (पूर्व) येथील कांता पेडणेकर यांचे ५ महिन्यांचे बालक शीतल वारे नावाच्या महिलेने विकले आहे अशी माहिती पोलीसपथकाला मिळाली होती.
याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी शीतल वारे हिला गोवंडी येथून ताब्यात घेतले. तिच्याकडे तपास केल्यावर तिने या प्रकाराची कबुली दिली. डॉ. संजय सोपानराव खंदारे व वंदना अमित पवार यांच्यामार्फत हे बालक गुहागर, रत्नागिरी येथील संजय गणपत पवार आणि सविता संजय पवार यांना २ लाख रुपयांना विकले असल्याचे तिने सांगितले. पोलीसपथक गुहागर येथे संजय पवार यांच्याकडे गेले. पवार यांच्याकडे ते बालक आढळल्यानंतर पोलिसांनी विक्रोळी पोलीसठाण्यात २०६/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३७०, ३४ सह वरिष्ठांच्या अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५, ८१,८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष २ कडे सोपविण्यात आला. या पथकाने अधिक तपास केला असता शीतल वारे हिने आपले साथीदार रद मारूती देवर व स्नेहा युवराज सुर्यवंशी यांचे मदतीने २ वर्षाची मुलगी अडीच लाख रुपयांना विकल्याचे समोर आले. ही मुलगी लिलेंद्र देजू शेट्टी यांच्याकडे आढळली.
ही दोन्ही बालके संबंधितांकडून ताब्यात घेत पोलिसांनी ती महालक्ष्मी येथील बाल आशा ट्रस्ट येथे ठेवली आहेत.
आरोपींनी अशाच प्रकारे महाराष्ट्र, तेलगंणा व आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये बालकांची विक्री पोलीस तपासात पुढे आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शशिकुमार मीना, उप आयुक्त (अंमलबजावणी) रागासुधा, उपआयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे,सहाय्यकआयुक्त, डी- दक्षिण, दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-२ चे निरीक्षक दिलीप तेजनकर, श्रीमती भोर (कक्ष-५), सहायक निरीक्षक दिनेश शेलार, उपनिरीक्षक शीतल पाटील, संजय भावे, सहायक फौजदार निंबाळकर, हवालदार जगदाळे, राणे, तांबे, साळुंखे, पाडवी, थिटमे, कांबळे, शिपाई हरड, शिंदे, सपकाळ,सय्यद, आव्हाड, चालक घाटोळ व पाटील यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
४/२९/२०२४ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: