विकसित भारतासाठी मतदार पुन्हा मोदी सरकारलाच सत्तेवर आणणार : जे. पी. नड्डा

 


बुलडाणा येथील सभेत व्यक्त केला विश्वास

मुंबई : विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनांमुळे सामान्य भारतीय माणसाच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. विकसित भारताची ही यात्रा अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येण्यासाठीच  मतदार 'एनडीए' ला स्पष्ट  कौल देतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी व्यक्त केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत श्री. नड्डा बोलत होते. शिवसेना नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, रावेर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई आदी यावेळी उपस्थित होते. भ्रष्टाचारात, घराणेशाहीत गुंतलेल्या काँग्रेसच्या इंडी आघाडीचा अनुभव सामान्य भारतीयाने घेतला आहे. त्यामुळेच भारताला समृद्ध , बलशाली बनवण्याचा निर्धार केलेल्या  भाजपा आणि एनडीए ला मतदार आशीर्वाद देतील, असेही श्री.नड्डा यांनी सांगितले.   

श्री. नड्डा यांनी या सभेत मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे गोरगरीब, वंचित वर्गाचे आयुष्य कसे बदलून गेले आहे, याचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की कोट्यवधी गोरगरीबांच्या मालकीच्या घराचे स्वप्न पंतप्रधान आवास योजनेमुळे पूर्ण झाले आहे. आजवर या योजनेत 4 कोटी लोकांना घर मिळाले आहे. आणखी 3 कोटी लोकांना या यॊजनॆत घरे देण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. ग्रामीण, दुर्गम भागात महिलांना पाणी आणण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत असत. मोदी सरकारच्या हर घर जल योजनेद्वारे 11 कोटी घरांमध्ये पिण्याचे पाणी नळाद्वारे पोहोचवले जात आहे. महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी तंगडतोड या योजनेमुळे थांबली आहे. 55 कोटी श्रमिक, गोरगरीब, वंचित लोकांना आयुष्मान योजनेद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळू लागले आहेत. मोदी सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक योजना गोरगरीब, वंचित, शोषित वर्गाला डोळ्यापुढे ठेवून आखली आहे. काँग्रेसने आजवर गरीबांना केवळ आश्वासने दिली. मात्र मोदी सरकारने शोषित,वंचित,गोरगरीब वर्गापर्यंत विकास योजनांचे फायदे थेट पोहचवले आहेत.

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. आणखी 3 वर्षांत भारताला 3 ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्यामुळे  काही वर्षांपूर्वीपर्यंत जपान, चीन मध्ये बनणारे  मोबाईल आता भारतात बनू लागले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग जाळे यांचे उभारले जात आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यासारखे प्रकल्प महाराष्ट्रात सुरु झाले आहेत,असेही श्री. नड्डा यांनी नमूद केले. श्री. नड्डा यांनी यावेळी मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. महायुती उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा मतदारसंघाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे, असेही त्यांनी नमूद केले .

विकसित भारतासाठी मतदार पुन्हा मोदी सरकारलाच सत्तेवर आणणार : जे. पी. नड्डा विकसित भारतासाठी मतदार पुन्हा मोदी सरकारलाच सत्तेवर आणणार : जे. पी. नड्डा Reviewed by ANN news network on ४/२१/२०२४ ०४:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".