काँग्रेसची वाटचाल मुस्लिम लीगच्या दिशेने; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सभेत जोरदार टीका
मुंबई : एका बाजूला विकसित भारताच्या मिशनने भारलेले भाजपाचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे कमिशनवर डोळा ठेवून केवळ सत्तेसाठी तळमळणारे कॉंग्रेसचे नेते अशी एक लढाई या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली असून एनडीएला 400 जागांचा टप्पा पार करून प्रचंड विजय मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. काँग्रेसची वाटचाल स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या मुस्लिम लीग च्या दिशेने सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित प्रचंड जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसच्या राजकारणावर सडकून टीका केली. काँग्रेस जितकी वर्षे सत्तेत राहिली, त्यांनी कमिशन घेण्यालाच प्राधान्य दिले. इंडी आघाडी कमिशनसाठी धडपडत आहे, तर एनडीए सरकार आणि मोदी सरकार विकासाचे मिशन पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे, असे ते म्हणाले. 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. काँग्रेसची सरकारे जे अनेक दशकांत करू शकले नाहीत ते भाजपाने 10 वर्षांत करून दाखवले आहे. त्यामुळे 4 जूनपर्यंत 400 जागांचा टप्पा ओलांडू, असे केवळ आम्ही नाही, तर सारा देश म्हणत आहे, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी व अन्य भाजपा नेते याप्रसंगी उपस्थित होते.
मी देशाला झुकू देणार नाही, मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, मी निराशेचे आशेत रूपांतर करेन, मी आशेचे विश्वासात रूपांतर करेन, अशी ग्वाही मी 2014 मध्ये सत्ताग्रहण करताना देशाला दिली होती, याचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की,तुम्ही तुमच्या आशीर्वादात कोणतीही कसर सोडली नाही. मोदींनी आपल्या मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही. त्या वेळी आपला भारत जगातील 11 वी आर्थिक शक्ती होता. मोदींनी 10 वर्षांत भारताला पाचवी जागतिक महासत्ता बनवले. आता जगात भारताचा उदोउदो होत आहे. युरोपात, अमेरिका आणि आफ्रिकेतही भारताचा उदोउदो होत आहे. भारताचे नाव जगात दुमदुमत आहे, आणि पुन्हा मोदी सरकारच येणार असा आवाज देशात चहुबाजूंनी दुमदुमत आहे. 2024 ची निवडणूक ही केवळ सरकार स्थापन करण्याची निवडणूक नाही, तर ही निवडणूक विकसित भारत घडवण्याची आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, तेव्हा उपस्थित प्रचंड जनसमुदायाने मोदीनामाचा गजर करत त्यास जोरदार प्रतिसाद दिला. यावर्षी रामनवमीला आपले प्रभू श्रीराम मंडपात नाही तर भव्य मंदिरात दर्शन देणार आहेत ही आमच्या पिढीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवणे हे आमचे ध्येय होते. हे ध्येय पूर्ण झाले आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांनी फेकलेले दगड उचलूनच मोदी सरकार विकसित जम्मू-काश्मीरची उभारणी करत आहे. विकास हा भाजपाचा हेतू आणि विकसित भारत ही भाजपाची वैचारिक निष्ठा आहे आणि त्यानुसारच धोरणात्मक वाटचाल सुरू आहे.
आज जी काँग्रेस उरली आहे, तिच्याकडे कोणतेही धोरण नाही. काल काँग्रेसने ज्या प्रकारचे घोषणापत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केले, त्यावरून आजची काँग्रेस भारताच्या आकांक्षांपासून दूर असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य चळवळीवेळी जी विचारसरणी मुस्लिम लीगची होती, तीच विचारसरणी त्यांच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि काही प्रमाणात डाव्यांचे वर्चस्व आहे. काँग्रेस दूर-दूरपर्यंत दिसत नाही, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे लक्ष वेधले.भ्रष्टाचारी लोक गरीबांची स्वप्ने हिरावून घेतात. अधिकार मर्यादित करतात. तुमचा मुलगा नोकरीसाठी पात्र ठरला आणि त्याच्या जागी दुसऱ्याला नोकरी दिली तर तुमचे काय होईल? मी तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी शिव्या खात आहे. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी ते रॅली, मोर्चे काढत आहेत. मला विश्वास आहे की, तुम्ही भाजपा आणि एनडीएला प्रचंड बहुमताने विजयी कराल, अशा शब्दांत मोदी यांनी भाषणाचा समारोप केला, तेव्हा अवघे सभास्थान मोदी यांच्या विजय घोषणांनी दुमदुमत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: