पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करून ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम मालकाला न देता परस्पर हडप करून पसार होणार्या एका ठकसेनाला अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे. हा आरोपी सतत ३ वर्षे आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत होता.
साइमन रॉनी पीटर वय ४० वर्षे, राहणार ए १/५०९, ब्रुकफिल्ड विलोज जवळ,धर्मावद पेट्रोलपंप, उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे असे या आरोपीचे नाव आहे. त्याने मागील तीन वर्षात शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांकडे काम करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. त्याच्याविरोधात चिखली पोलीसठाण्यात ७५०/२०२३ क्रमांकाने भादंवि कलम ४०८ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट १ करित होते.पोलीसपथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि सखोल तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गोरख कुंभार, उपनिरीक्षक शिवाजी कानडे,अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळू कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक, मनोजकुमार कमले,फारुक मुल्ला सचिन मोरे,प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: