महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद !

 


पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पणजी (गोवा) - महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’ या कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम ताळगाव येथील ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम’मध्ये नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अंतर्गत पार पडलेल्या विविध सत्रांमध्ये ‘रिजनरेटिव्ह टुरिझम्’, ‘हिंटरलँड टूरिझम्’ (ग्रामीण पर्यटन), ‘ॲडव्हेंचर टूरिझम्’, ‘कल्चरल टूरिझम्’, ‘डिजिटल नॉमॅडिक टूरिस्ट’ इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण परिसंवाद पार पडले. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधींनी ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पर्यटकांसाठी गोवा राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाशी संबंधित विविध पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा केली.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने भारतासह व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, नेपाळ, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, पनामा, आफ्रिकी देश, युरोपीय देश आदी २५ देशांतून आलेल्या पर्यटन क्षेत्राशी निगडित आस्थापनांच्या प्रतिनिधींना अनोख्या आध्यात्मिक अनुभूतींचे महत्त्व विशद केले. प्रतिनिधींनी विश्वविद्यालयाचा विषय जाणून घेतला आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी संभाव्य सहकार्याविषयी स्वारस्यही दाखवले.

विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधी आणि व्यवसायाने बालरोगतज्ञ असलेल्या डॉ. अमृता देशमाने यांनी या कार्यक्रमाच्या फलश्रुतीविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमात पर्यटनाशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींशी झालेल्या संवादामुळे भागीदारी आणि सहयोग यांविषयीच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. गोवा आणि त्या पलीकडे आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण नवीन पर्याय शोधण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्थपूर्ण आणि समृद्ध अनुभवांच्या शोधार्थ असलेल्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या आध्यात्मिक वारशाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने पर्यटन भागधारकांमध्ये वाढते स्वारस्य आढळून आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या प्रदेशातील आध्यात्मिक पर्यटनासाठी भागीदारी वाढवण्यासाठी उत्सुक आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद ! महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद ! Reviewed by ANN news network on ४/०६/२०२४ ०१:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".