अन्य एका अभियंता महिलेवरही गुन्हा दाखल
नगर : पाटबंधारे संशोधन आणि जलनि:सारण विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयात सहाय्यक अभियंता पदावर काम करणार्या एका महिलेला ठेकेदाराकडून ६२ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने १८ एप्रिल रोजी 'रंगेहाथ' पकडले असून तिच्यासह नाशिक येथील कार्यालयात काम करणार्या कार्यकारी अभियंता महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूबिया मोहम्मद हनिफ शेख, वय ३५ वर्ष, पद - सहाय्यक अभियंता वर्ग – १, पाटबंधारे संशोधन व जलनिःसारण उपविभाग,अहमदनगर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून रजनी पाटील, कार्यकारी अभियंता वर्ग - १ पाटबंधारे संशोधन विभाग, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
या दोन्ही आरोपी महिलांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७ (अ), १२ अन्वये अहमदनगर येथील भिंगार कॅम्प पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाटबंधारे संशोधन व जलनिःसारण विभागात ठेकेदारी करणार्या एका व्यक्तीने अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या अहमदनगर येथील कार्यालयात तक्रार दिली होती.
तक्रारदाराने उंबरे, ता. राहुरी येथे येथे पूर्ण केलेल्या कामाचे ७ लाख ७५ हजार ९६३ रुपयांचे बिल अदा केले म्हणून रूबिया शेख हिने तिच्यासाठी बिलाच्या ८ टक्के आणि रजनी पाटील हिच्यासाठी १० टक्के असे एकूण १ लाख ३९ हजार ५०० रुपये लाचेपोटी मागितले. तक्रारदाराने याची तक्रार अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या अहमदनगर येथील कार्यालयात केली. अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या पथकाने पडताळणी केली असता तक्रारीत तत्थ्य असल्याचे आढळल्याने सापळा लावण्यात आला. आणि, मागणी केलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये स्वीकारताना रूबिया शेख हिला 'रंगेहाथ' पकडण्यात आले. ही लाच स्वीकारण्यासाठी दुजोरा दिला म्हणून रजनी पाटील हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: