स्थलांतरीत झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आनंदनगर शाखेत सुविधांची वानवा

 

गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये संताप

ग्राहकांना चांगल्या व तत्पर सुविधा देण्याची जनतेची मागणी

विठ्ठल ममताबादे

उरण  : उरण तालुक्यातील  वकील ऍड. दत्तात्रेय नवाळे हे गेल्या ३२ वर्षापासून महाराष्ट्र बँकेचे ग्राहक आहेत.मात्र आनंदनगर येथील बँकेत विविध नागरिकांना, जेष्ठ महिला, आबाल वृद्ध, विद्यार्थी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.ही बाब  नवाळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगर मध्ये मिळणाऱ्या अपुऱ्या सेवा सुविधा बाबत आवाज उठविला असून बँकेत नागरिकांना चांगल्या व त्वरित सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहारसुद्धा केला आहे.बैंक ऑफ महाराष्ट्र ०००८६ शाखा उरणचा कारभार या पूर्वी उरण मधील दशाश्री माळी कॉप्लेक्स, मोरा रोड उरण येथुन चालू होता. गेल्या सहा महीन्यापासून सदरची शाखा  आनंद नगर उरण शहर येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. या पुर्वी म्हणजे १५ ते २० वर्षापुर्वी सदरच्या शाखेमधे १५ ते २० कर्मचारी कार्यरत होते . परंतु आत्ता तेथे फक्त ५ कर्मचारी काम करीत असताना दिसतात.आत्ता आनंद नगर उरण येथे चाललेल्या बँकेच्या कारभार अंदाधुंदी अवस्थेत चालू आहे.

ग्राहकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याचा परिणाम बँकेच्या खातेदारावर होत आहे. अनेक ग्राहक बँकेतील खाते बंद करत आहेत.त्यामुळे ऍड नवाळे यांनी या अन्यायाला वाचा फोडली आहे.पुर्वीची शाखा जवळ जवळ ४० x १५ फ़ूट एवढया जागेमधे चालू होती ती आत्ता २० x १५  फ़ूट ऐवढयाच जागेमधे चालू आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी शाखेमधे उभे राहण्याससुद्धा जागा नसते.पुर्वीच्या शाखेमधे रक्कम देणे व घेण्याकरीता एकूण ३ कांऊटर उपलब्ध होते त्या ऐवजी या सर्व कामासाठी १ कांऊटर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच रांगेमधे अर्धा ते पाऊण तास रखडत उभे रहावे लागते. त्यांना तेथे बसण्याची सुद्धा सोय केलेली नाही.बँकेने लावलेल्या ए.टी.एम. मशीन मधे २ ते ३ दिवस कधी कधी रक्कमच उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहकांना बाहेरील बँकांच्या ए.टी.एम. कडे धाव घ्यावी लागते व त्यांना त्या करीता फुकटचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेत चौकशी केली असता ए.टी.एम. चालविण्याचे काम दुसरी एजन्सी करते असे सांगितले जात आहे.मग त्यांना वेळोवेळी सूचना देणे व वेळेवर रक्कम उपलब्ध करणे बँकेचे काम नाही काय ? एकदा तर शनिवार ते सोमवार पुर्णपणे ए. टी. एम. मधे रक्कमच नव्हती. बँकेने स्वतः बनविलेल्या नियमा नुसार एका दिवसाला जास्तीत जास्त फक्त पन्नास हजार रक्कम भरण्यास परवानगी असते. त्या पेक्षा जास्त रक्कम भरल्यास रूपये ११८ दंड भरावा लागतो. म्हणजे एखादया ग्राहकाला त्याचे खात्यामधे २ लाख रूपये भरावयाचे असल्यास दंड माफ करण्याकरीता त्याने ४ दिवस रक्कम भरणे करीता शाखेमधे त्याची इतर कामे सोडून फेऱ्या माराव्या लागतात. बँक ऑफ महाराष्ट्र ही जनतेची बैंक जनतेच्या हितासाठी आहे की जनतेला लुटून धंदा करण्यासाठी आहे असा प्रश्न सध्या पडला आहे. कारण रक्कम काढावयाची म्हटले तरी सध्या स्लीप ऐवजी धनादेश घेऊनच बैंक रक्कम देते. म्हणजे ग्राहकाने जास्तीत जास्त धनादेश वापरावे व त्याद्वारे बँकेचा धनादेश देण्याचा धंदा चालावा व त्यातून नफा कमवायचे काम बैंक करून ग्राहकांना लुटायचे काम बँक करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही गेल्या कित्तेक वर्षापासुन नफ्यामधे असुन बँकेतर्फे कित्तेक करोडो रूपयांचा नफ्याची रक्कम केंद्र सरकारला देत आली आहे. गेल्या १० ते १५ वर्षामधे कित्तेक कर्मचारी निवृत्त होऊन सुद्धा बँकेने त्यांचे ठिकाणी नवीन भरती केलेली नाही. त्या करता आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी २ ते ३ वेळा संप करून सुद्धा महाराष्ट्र बँकेने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. त्यामुळेच वरील सर्व अडचणी ग्राहकांना सोसाव्या लागत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही उरण मधील सर्वात जुनी बँक असुन तेथे मोठया प्रमाणात खातेदारांची संख्या आहेत. या सर्व अडचणीमुळे कित्तेक खातेदार आपली खाती इतर बँकेत हस्तांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. तरी या बाबतीमधे उरण वासीयांना उत्तम सेवा देण्याकरीता योग्य ती पावले उचलावीत अन्यथा ग्राहकांना दुसऱ्या बँकेची वाट धरल्या शिवाय उपाय नाही.अशी मागणी जनतेतून केली जात आहे. या समस्या बाबतीत हायकोर्टचे वकील तथा उरण मधील प्रसिद्ध वकील ऍड. दत्तात्रेय नवाळे यांनी झोनल ऑफीस बँक ऑफ महाराष्ट्र सीडको ओल्ड ऍडम बिल्डींग पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुबंई ४००७०३ येथे तसेच  महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालय, १५०१, लोकमंगल, शिवाजी नगर, पुणे-४११००५ येथे पत्रव्यवहार देखील केला आहे.
स्थलांतरीत झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आनंदनगर शाखेत सुविधांची वानवा स्थलांतरीत झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आनंदनगर शाखेत सुविधांची वानवा Reviewed by ANN news network on ४/१५/२०२४ ०९:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".