पिंपरी : महाळुंगे इंगळे येथे २८ मार्च रोजी मोबाईल फोडला म्हणून आपल्या मित्राची हत्या करणार्या एका तरुणाला मध्यप्रदेशातील त्याच्या मूळगावातून अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ३ ने अटक करण्यात यश मिळविले आहे.
रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय ३०, रा. रेयाना ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपला मित्र कालू मंगल रकेवार (वय २३, रा.महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ पप्पू मंगल रकेवार याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
आरोपी, मृत तरूण आणि त्याचा भाऊ हे एकाच खोलीत रहात होते. २६ मार्च रोजी आरोपीने मृत कालू याचा मोबाईल फोडला. म्हणून कालू याने २८ मार्च रोजी आरोपी रामसिंग याचा मोबाईल फोडला. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. या दरम्यान तक्रारदार पप्पू भाजी आणण्यासाठी बाहेर गेला. तो परतला तेव्हा आरोपी रामसिंग कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करताना आणि कपड्याने त्याचा गळा आवळताना दिसून आला. कालू मृत झाल्या पाहताच आरोपी रामसिंग पसार झाला.
पप्पू याने या खुनाची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. रामसिंग पसार झाल्यानंतर त्याने मोबाईल बंद केल्याने त्याचा ठावठिकाणा लागणे कठीण झाले होते. तो आपल्या मूळ गावी गेला असावा असा तर्क करून पोलिसांनी त्याचे गाव गाठले.पोलिसांना पाहताच रामसिंह पळून जाऊ लागला. परंतु पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक शैलेश गायकवाड, अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हणमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, महेश भालचिम यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: