पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट २ ने चिंचवडमधून अपहरण झालेल्या एका मेंढपाळाची सुटका अंबेजोगाई, जि. बीड येथून केली असून अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय २२ वर्षे धंदा मजुरी रा. काळयाची वाडी ता. धारूर जिल्हा बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास चिंचवडगावातील धनेश्वर मंदिरनजिक पायी जात असलेल्या एका व्यक्तीला जबरदस्तीने पांढर्या रंगाच्या गाडीत कोंबून त्याचे अपहरण केल्याची माहिती नियंत्रणकक्षाने गुन्हेशाखेला दिली होती.
गुन्हेशाखेच्या पथकाचे प्रभारी जितेंद्र कदम आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याठिकाणी जाऊन माहिती घेतली असता अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव तुकाराम साधू शिंपले, वय ४०, मूळ राहणार अंबेजोगाई, बीड असे असून तो दोन वर्षांपासून धनेश्वर मंदिराच्या बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये रहातो. आणि, धनेश्वर मंदिराच्या गोशाळेतील गायी राखतो अशी माहिती पथकाला मिळाली.
त्याची पत्नी जिजाबाई मंदिरासमोर बेलपत्रे विकण्यासाठी बसत असल्याने तो रोज पहाटे बेल आणून तिला देत असे आणि त्यानंतर गायी सांभाळण्यासाठी जात असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे बेल घेऊन येत असताना त्याचे अपहरण झाले अशी माहितीही पथकाला मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एक चप्पल आणि सुती पिशवी पोलिसांना मिळाली. मात्र, गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासलेला असल्याने सीसीटीव्ही फुटेजवरून अपहरणकर्त्यांच्या गाडीचा नंबर मिळू शकला नाही. सापडलेली चप्पल धनगर आणि अन्य काही समाजाचे लोक वापरत असलेल्या चपलेप्रमाणे असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गाडी गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासली आणि मागोवा घेतला असता गाडी बीडच्या दिशेने गेल्याचे त्यांना समजले.
त्यानंतर उपनिरीक्षक गणेश माने, अंमलदार जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख हे बीड येथे गेले. या पथकाने अंबेजोगाई येथे तपास केला असता अपहरण झालेला तुकाराम शिंपले हा पूर्वी अंबेजोगाई येथे शेळ्यामेंढ्या खरेदीचा व्यवसाय करत होता. त्याने मध्यस्थी केलेल्या एका व्यवहाराचे पैसे खरेदीदाराने न दिल्यामुळे त्याला आपली शेती, दागदागिने विकून देणी भागवावी लागली असल्याचे पोलिसांना समजले. त्याचबरोबर तो सध्या चिंचवड येथे उपजिविकेसाठी गेला आहे अशी माहितीही तेथील नागरिकांनी पोलीसपथकाला दिली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता काळयाचीवाडी ता. धारुर जि. बीड येथील ज्ञानेश्वर यादव रुपनर हा आठ दिवसांपूर्वी दोन तीन वेळा चिंचवडला जाऊन आल्याची माहिती मिळाली. पोलिसपथाकाने त्यानंतर ज्ञानेश्वर रुपनरवर लक्ष केंद्रित केले. त्याचे राहते गाव दुर्गम भागात होते. तेथे मोबाईल नेटवर्कही नीट मिळत नव्हते. पोलिसांनी वेशांतर करून सलग दोन दिवस त्या भागात तळ ठोकला. आणि रुपनरवर पाळत ठेवली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्याने दाद दिली नाही. पथकाने त्याच्या घर आणि परिसराची पाहणी केली असता एका पत्र्याच्या शेडला कुलूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामध्ये कोणीतरी असावे असा संशय आल्याने पोलिसांनी कुलूप तोडून पाहिले असता आतमध्ये तुकाराम शिंपले याला डांबून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी त्याची सुटका केली.
त्यानंतर रुपनर याने शिंपले याचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार मेंढपाळ रघुनाथ नरुटे याच्या शेळया-मेंढी विक्री व्यवहारामध्ये तुकाराम शिंपले याने मध्यस्थी केली होती परंतु खरेदीदार याने साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तो तुकाराम शिंपले याच्याकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिल्यामुळे रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर व भाच्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज सोळुंके व नितिन जाधव यांना एर्टिगा गाडी नंबर एम एच ०४ एफ झेड ९४१७ भाडयाने करुन देऊन तुकाराम शिंपले याचे अपहरण करण्याची सुपारी दिली. त्याप्रमाणे त्याचे अपहरण करण्यात आले होते.
गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी,उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक गणेश माने, सहायक फौजदार दिपक खरात, जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख, देवा राऊत यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/०४/२०२४ ०९:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: