मुंबई पोलिस गुन्हेशाखा कक्ष ३ च्या पथकाने आवळल्या मुसक्या!
मुंबई : मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २००८ साली अरुण गवळी टोळीतील गुंडांनी हत्या केली होती. या प्रकरणात अरुण गवळीसह ११ आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली असून हे आरोपी वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या पैकी एका आरोपीची पॅरोलवर सुटका झाली असताना. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्याला पकडण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष ३ च्या पथकाला यश आले आहे.
नरेंद्र लालमनी गिरी, वय ३९ वर्षे असे या गुंडाचे नाव आहे. तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला ११ नोव्हेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात हजर होणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता तो फरार झाला.त्यामुळे कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे तक्रार नोंदविली. त्यावरून २२ /२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम २२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास तुर्भे पोलिसांबरोबरच मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष ३ चे पथक करत होते.
हा गुंड अन्य राज्यात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी रहात असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण जात होते. तथापि ६ मार्च रोजी तो घणसोली येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला घणसोली येथून रात्री साडेअकरा वाजता अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपरआयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे व सहायक आयुक्त, प्रकटीकरण (मध्य) चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष -३ चे प्रभारी निरीक्षक दिपक सुर्वे, उपनिरीक्षक इंद्रजीत सिरसाट, हवालदार. शिवाजी जाधव, आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड व महिला शिपाई दीपिका ठाकूर यांनी पार पाडली आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०७/२०२४ ०९:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: