पिंपरी : तळेगाव दाभाडे पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक अट्टल मोटारसायकलचोर गजाआड झाला असून त्याच्याकडून १९ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे तळेगाव दाभाडे पोलीसठाण्याच्या हद्दीतील ८ व कोरेगाव पोलीसठाण्याच्या हद्दीतील १ असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे वय ४० वर्षे रा. तळेगाव दाभाडे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे पोलीसठाण्यातील शिपाई हर्षद कदम यांना ४ डीसेंबर २०२३ रोजी चोरीस गेलेली एक मोटारसायकल शिवाजी महाराज चौकात उभी आहे अशी माहिती मिळाली. उपनिरीक्षक रविंद्र खामगळ आणि हवालदार कोकतरे यांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता ही मोटारसायकल आरोपी डमाळे याने तेथे उभी केली असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी डमाळे याला मारुतीमंदिर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे 'व्यवस्थित' चौकशी केली असता त्याने ही मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. याशिवाय इतरही अनेक वाहने तळेगाव दाभाडे पोलीसठाण्याच्या हद्दीतून चोरून ती त्याचा साथीदार लालू सखाराम मेंगाळ रा. कॉलनी वाडी इंदोरे, ता. इगतपुरी याच्या मदतीने नाशिक जिल्हयातील इगतपुरी व पालघर जिल्हयातील मोखाडा या भागात विकल्याचीही कबुली दिली. त्यानंतर पोलीसपथकाने इगतपुरी येथून १०, मोखाडा येथून ०४ तसेच तळेगाव दाभाडे परिसरातून ०५ अशी १९ दुचाकी वाहने जप्त केली.
यामुळे तळेगाव दाभाडे पोलीसठाण्याच्या हद्दीतील ८ व कोरेगाव पोलीसठाण्याच्या हद्दीतील १ असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडल ०२ बापू बांगर, सहायक आयुक्त, देहुरोड विभाग देवीदास घेवारे, तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ निरीक्षक किशोर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक रविंद्र खामगळ,सहायक फौजदार कदम,हवालदार कोकतरे, शिपाई कदम, सगर, ओव्हाळ, मोहीते, झेंडे, मदने यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा