मुंबई दक्षिण सायबर पोलीसठाण्याच्या पथकाची कामगिरी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशाखेने कोलकाता येथे कॉलसेंटर चालवून त्याद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणार्या एका टोळीला सिलिगुडी, पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात यश मिळविले आहे.
या टोळीतील ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० लाख रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रयान कालौल शाहदास वय २२ वर्षे, अरुणभा अमिताभौ हलधर, वय २२ वर्षे, रितम अनिमेश मंडल, वय २३ वर्षे, तमोजीत शेखर सरकार, वय २२ वर्षे, रजिब सुखचांद शेख, वय २४ वर्षे, सुजोय जयंतो नासकर वय २३ वर्षे, रोहीत बरून बैदय, वय २३ वर्षे सर्व राहणार कोलकाता यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
महर्षी कर्वे रोड, चर्चगेट येथे राहणार्या एका व्यक्तीने या प्रकरणी ७ मार्च रोजी तक्रार दिली होती. त्या व्यक्तीसह त्याची पत्नी आणि परदेशात राहणारी मुलगी यांचे बँकखाते, डेबिट कार्ड, क्रेडिटकार्ड यांची माहिती मिळवून अज्ञातांनी अनेक ऑनलाईन पोर्टलवरून १ कोटी ४८ लाख ५६ हजार रुपयांच्या महागड्या वस्तुंची खरेदी केली होती.
या प्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई, येथे १३/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४१९,४२०,४६७,१२० (ब) माहिती तंत्रज्ञात कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपी चालवत असलेल्या कॉलसेंटरचा छडा लावला. पोलिसांचे पथक आरोपींना अटक करण्यासाठी कोलकाता येथे गेले होते. परंतु पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी सिलिगुडी येथे पलायन केले. पोलीसपथक त्यांचा माग काढत सिलिगुडी येथे पोहोचले. आणि, स्थानिक पोलिसाच्या मदतीने त्यांनी आरोपींना अटक केली.
हे आरोपी कोलकाता येथे कॉलसेंटर चालवत होते. वेगवेगळ्या व्यक्तींना कॉल करून क्रेडिटकार्ड बाबत कॉल करून त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन त्या आधारे ऑनलाईन शॉपींग करत होते.
त्यांच्याकडून रोख रक्कम ५० लाख, २७ मोबाईल फोन, ५ घड्याळे, ३ इअर बड, १ मॅकबुक, १ आयपॅड, ११ परफ्यूम बाटल्या, २ लेडीज बॅग, २ फ्रिज, २ एअर कंडिशनर, २ प्रिंटर, १ किचन चिमणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या पैशातून खरेदी केलेल्या ६० लाख रुपये किमतीच्या वस्तू आरोपींना पोहोचल्या होत्या. बाकीच्या ऑर्डर्स थांबविण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयक्त, देवेन भारती, सहआयुक्त, गुन्हे, लखमी गौतम, अप्पर आयुक्त, गुन्हे शाखा, शशिकुमार मिना, उपआयुक्त (प्रकटीकरण)दत्ता नलावडे, सहायक आयुक्त, सायबर गुन्हे शाखा, अबुराव सोनावणे, वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, निरीक्षक किरण जाधव,मंगेश मजगर, उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे, श्वेता कढणे, धनवेश पाटील,सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम घोडके, नाईक संतोष गलांडे, संदिपान खरजे, प्रवीण चाळके, किरण झुंजार,शिपाई निखील गाडे यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
३/१७/२०२४ १२:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: