शनिवार, ९ मार्च, २०२४

मोटारसायकलचोराला हातकड्या!; १६ मोटारसायकली जप्त!!

 


 भोसरी पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी एका सराईत मोटारसायकलचोराला अटक केली असून त्याच्याकडून १६ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकंदर १४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

योगेश शिवाजी दाभाडे, वय २४ वर्ष, रा. वळसाने, ता. साक्री, जि. धुळे असे या चोराचे नाव आहे. त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकंदर १७  मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत.

भोसरी परिसरात मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याने भोसरी पोलिसांचे पथक याचा तपास करत होते.अनेक ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मोटारसायकलचोराची ओळख पटली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला साथीदार मॉन्टी वाघ वय २२ वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव जि. जळगाव याला बरोबर घेऊन भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी परिसरात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. आणि, १६ मोटारसायकली पोलिसांना काढून दिल्या. या मोटारसायकलींची किंमत सुमारे ३ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे.

या चोराच्या अटकेमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील ०७ गुन्हे, म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील ०२ गुन्हे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील ०१ गुन्हा, चाकण पोलीस ठाण्यातील ०१ गुन्हा , सांगवी पोलीस ठाण्यातील ०१ गुन्हा, खडकी पोलीस ठाण्यातील ०१ गुन्हा, लोणीकंद पोलीस ठाण्यातील ०१ गुन्हा असे एकंदर १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी,उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे,सहाय्यक आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे,  वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक रूपाली बोबडे  यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोरे, हवालदार हेमंत खरात, नाईक नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, मुळे,अंमलदार स्वामी नरवडे,सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते,महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा