पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात कारागृह प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त महिल्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कारागृहात सुमारे ३०० महिला कैदी असतात. त्यांच्यासाठी दरवर्षी महिलादिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षीच्या कार्यक्रमात श्री गणेश वंदना, लावणी, कथ्थक, झुंबा, देवी गोंधळ, मंगळागौर, शिवतांडव, बांगला डान्स, नटरंग, भारुड, बाईपण भारी देवा व विविधतेतून एकतेचा संदेश देणारा फॅशन शो अशा विविधरंगी कार्यक्रमांचा समावेश होता.
११ नोव्हेंबर २०२३ रोजी एका महिला कैद्याने कारागृहात मुलाला जन्म दिला. त्याचा नामकरण सोहळाही यावेळी पार पडला. शिवा असे या मुलाचे नाव ठेवण्यात आले.
महिला कारागृहात बसविण्यात आलेल्या वॉशिंग मशिनचे तसेच रोटरी क्लबने दिलेल्या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते झाले. त्यांनी या निमित्ताने महिला कैद्यांना विशेष माफी जाहीर केली.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पल्लवी कदम, रविंद्र गायकवाड,वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद कांदे, रोटरी क्लब ऑफ खडकीच्या अध्यक्ष पूनम किशनचंदानी, उमा अग्रवाल, शिखा गुप्ता, रुपल पटेल, सीमा बेडेकर, शितल तेजवाणी, सुनिती गोयल, मंजू प्रसाद आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा