मुंबई : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने रेल्वेच्या एका अभियंत्याला लाचखोरीच्या प्रकरणात दोषी ठरवून ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंड अशी शिक्षा फर्मावली. सीबीआयने सापळा लावून या अभियंत्याला लाच घेताना 'रंगेहाथ' पकडले होते.
के. एल. मीणा असे या अभियंत्याचे नाव असून तो मुंबईतील पश्चिम रेल्वे विभागातील विद्युत अभियंता (ऊर्जा) या पदावर कार्यरत होता.
पश्चिम रेल्वेच्या डीईई विभागात, विद्युत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या के. एल. मीणा याने एका व्यक्तीकडे कंत्राट देण्याच्या बदल्यात, ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्या व्यक्तीने १५ एप्रिल २०१५ रोजी याची तक्रार सीबीआयकडे केली होती. सीबीआयने सापळा रचून, २४ एप्रिल २०१५ रोजी मीणा याला तक्रारदाराकडून, १ लाख रुपयांची लाच घेतांना 'रंगेहाथ' पकडले होते.
सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने १३ ऑक्टोबर २०१५ रोजी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर, २९ सप्टेंबर २०१६ रोजी, त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने, के. एल. मीणा याला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. या खटल्यात सीबीआयने १२ साक्षीदार न्यायालयासमोर हजर केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: