पिंपरी : एका सराईत गुन्हेगाराच्या भावाचा खून झाला असताना त्याच्या छिन्नविछिन्न चेहर्याचे फोटो इन्स्टाग्राम स्टेटसला ठेवल्यामुळे एका तरुणाचे अपहरण करून त्याचा गाडीतच खून करण्यात करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट महाराष्ट्र गुजराथ हद्दीवरील् घनदाट जंगलात लावण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
आदित्य युवराज भांगरे, वय १८ वर्षे, रा. भांगरे वस्ती, म्हाळुंगे ता. खेड जि. पुणे हा १६ मार्चपासून बेपत्ता होता.महाळुंगे एम आय डी सी पोलीसठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
दरम्यान १८ मार्च रोजी रासेफाटा येथील मराठा हॉटेलमध्ये स्वप्नील शिंदे नामक तरुणावर गोळीबार झाला होता. त्याचा तपास चाकण पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक प्रसन्न जर्हाड आणि त्यांचे पथक करत होते. त्यांनी या गुन्ह्याच्या संदर्भात तपास करून अमर नामदेव शिंदे, वय २५ वर्षे, रा. कासार आंबोली ता. मुळशी जि. पुणे याला २३ मार्च रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून वेगळ्याच गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आदित्य भांगरे याचे अपहरण करून त्याचा खून राहुल पवार याने आपल्या न अन्य साथीदारांच्या साह्याने केल्याची कबुली अमर शिंदे याने दिली.
राहुल पवार याच्या भावाचा खून तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्याच्या छिन्नविछिन्न चेहर्याचे फोटो आदित्य भांगरे याने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसला ठेवले होते. त्यामुळे राहुलने आदित्य याचे १६ मार्च रोजी अपहरण केले. गाडीमध्येच वायरच्या साह्याने त्याचा गळा आवळून खून केला. आणि, निमगाव शिवारात असलेल्या डोंगरामध्ये त्याचा मृतदेह जाळला, अशी कबुली अमर शिंदे याने पोलिसांकडे दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तशा कोणत्याही खुणा न आढळल्याने पोलिसांनी अमर याला पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्याने ही खोटी माहिती तपासकाम भरकटवण्यासाठी दिल्याची कबुली देत. आदित्य याचा मृतदेह महाराष्ट्र गुजराथ सीमेवरील जंगलात जाळल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली असता त्यांना मृतदेहाचे अवशेष आढळले. ते ताब्यात घेऊन पोलिसांनी फोरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. आरोपी अमर शिंदे याला महाळुंगे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राहुल पवार व अन्य साथीदार यांचा शोध पोलीस घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: