विजय शिवतारेंच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी संतप्त
पिंपरी : बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथील शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निराधार वक्तव्य करत असून त्यांनी अजित पवारांची माफी मागावी. अन्यथा मावळ, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यात शिवसेना उमेदवारांचा प्रचार करणार नाही, असा कडक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला. यावेळी नाना काटे, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, मोरेश्वर भोंडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिवतारे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवतारे यांच्या वक्तव्याचा आम्हाला राग आहे. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ते आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत चुकीची विधाने करत आहेत.त्यांच्या विधानामुळे महाआघाडीत तेढ निर्माण होत आहे. असे गव्हाणे यावेळी म्हणाले.
मंगळवारी राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलत होते. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष मोरेश्वर भोंडवे, फजल शेख आदी उपस्थित होते.
गव्हाणे पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही महाआघाडीत सहभागी आहे, त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्यासाठी आम्ही आघाडीचा धर्म पाळत आहोत. मात्र, विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बिनबुडाचे वक्तव्य करून युतीचे पालन केले नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी आपण करत असल्याचे गव्हाणे यांनी यावेळी सांगितले.
शिवतारे यांनी माफी मागितली नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर मावळसह संपूर्ण राज्यात शिवसेना उमेदवाराच्या विरोधात प्रचार करू. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. असेही ते म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
३/२०/२०२४ ०९:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: